वैशिष्ट्ये
नागेश्वर मंदिर
पारोळा या इतिहासप्रसिद्ध तालुक्यातील उंदिरखेडे या गावात नागेश्वर महादेवाचे पेशवेकालीन प्राचीन मंदिर स्थित आहे. खान्देशात मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा पाया भक्कम करणारे आणि पेशवाईत पुण्याचे दिवाण असलेल्या त्रिंबकराव पेठे यांनी या मंदिराची उभारणी केली. पेशवेकालीन मराठा स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर नदी किनारी एका टेकडीवर रमणीय परिसरात वसले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील नागेश्वर महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यामुळे या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. या मंदिराचा इतिहास असा की मुळच्या कोकणातील गुहागर येथील पेठे घराण्यातील त्रिंबकराव पेठे हे २२ ऑक्टोबर १७२८ रोजी श्रीमंत चिमाजी आप्पा यांचे कारभारी गोविंद कृष्ण यांच्या हाताखाली कारकून म्हणून रूजू झाले होते. त्यांचे वडिल विसाजी कृष्ण हे खान्देश प्रांतात कमाविसदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर १७३० मध्ये त्रिंबकराव यांची नियुक्ती या पदावर झाली. खान्देश व बागलाण प्रांतात त्यांनी महसूल वसुलीची चोख व्यवस्था निर्माण करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. पेशव्यांनी त्यांना उंदिरखेडे गाव इनाम म्हणून दिले होते. २८ मार्च १७५३ रोजी, पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे पुण्याच्या दिवाणपदाची जबाबदारी देण्यात आली. या दरम्यानच्या काळात त्यांनी पारोळ्यानजीकच्या उंदिरखेडे येथे नागेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली.
संबंधित दुवे
महत्त्वाच्या वेबसाइट्स व उपयुक्त दुव्यांची यादी येथे उपलब्ध आहे.